मी समोरच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा असतो कि समोरच्याने आपल्या प्रामाणिक व्यवहाराने, वागणुकीने माझा विश्वास मिळवायचा असतो, जपायचा असतो? कोण ठरवतं हे? सुरुवात कुठून होते? कशी होते? माझा तुमच्यावर विश्वास नसेल तर त्यात चूक कुणाची? माझी? कारण माझी डोळे बंद करून विश्वास ठेवण्याची क्षमता नाही म्हणून. का तुमची? कारण तुम्ही बेधडक विश्वास ठेवता येईल असं नेहमी वागालच याची खात्री नाही. किती खेळ खेळतो न आपण, एक-मेकांच्या मनांशी? मनाला नको ते ओढताण. खरंतर आयुष्य सोप्प, सरळ असावं. जे मनांत असेल त्याप्रमाणे वागावं, त्याप्रमाणे बोलावं, त्याप्रमाणे करावं. नाही? मग यात डावपेच नाहीत आणि कसलंही गणित नाही. जे समोर दिसतंय तेवढंच सत्य! अगदी face value! नकोच तो मनाला त्रास.
आणि हे सगळं संपतं कुठे? कारण अविश्वासात केवढा धोका आहे! पूर्ण नातीच्या नातीच उध्वस्त करून जाऊ शकतो हा अविश्वास. कधी कधी एखाद्याचं पूर्ण आयुष्य देखील बरबाद होऊ शकतं या सगळ्या खेळांत. किती नाजूक आहे नाही हे विश्वासाचं बंधन? अगदी जीवापाड जपण्यायोगं. पवित्रता आहे यांत दडलेली. तुमच्या देवाशी तुम्ही नातं जपणार नाही इतकं हे माणसांतलं विश्वासाचं नातं जपलं पहिजे. कारण समोरच्या माणसावर, त्याच्या माणुसकीवर माझा विश्वास नसेल तर कुठेतरी माझीच माणुसकी हरवून जाईल, संपून जाईल. हो ना?