Friday, November 07, 2014

पानझड

वाऱ्याचा वेग आज इतका होता की खिडकीसमोरच्या झाडाच्या पानांना जणू मोह आवरेना. त्या उंच भक्कम झाडाशी आपले असणारे सारे संबंध सोडून वाऱ्याबरोबर उडत जाण्याची त्यांची इच्छा फारच तीव्रतेने जाणवत होती. का बरं असं वागावं त्या इवल्याश्या पानांनी? वर्षभर त्या झाडाने त्यांना जोपासलं, प्रेमाने लहानाचं मोठं केलं. आणि एक वाऱ्याची वेडी झुळुक येताच सगळं सोडून निघून जायला तयार झाली ही पानं? वारा काही हलकेच, अलगद नेणार नव्हता त्यांना. तो स्वतःच्या वेगात, तूफानीमधे हरवलेला होता. बेधुंद. बरोबर कुणी येतंय का नाही याची बिलकुल काळजी न बाळगणारा. आणि एकदाचा वाऱ्याचा वेग संपला की ती बिचारी पानं, हिरमुसलेली, वाळलेली, दमलेली, इथे-तिथे बिखुरलेली असणार. त्याच झाडाच्या मुळांशी.

वाऱ्याबरोबर बेभान उडण्याची मजा काही औरच असावी. क्षणिक इच्छेच्या भरात वाहून जाणं हे काही त्या भरभक्कम झाडाला कळणार नाही. आणि कायमचं वाऱ्याशी झुंज करत ताठ उभं राहणं काही त्या पानांना मानवणार नाही. प्रत्येकाने आपापल्या नशिबात जे लिहिलंय तेच आयुष्य जगायचं हेच सत्य. शेवटी म्हणतात ना, everything tends to chaos. तसंच काहीसं असणार.